मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या दूरध्वनी अभिवेक्षण केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जुलै २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सीबीआयने पांडे यांना शनिवारी नवी दिल्ली येथे अटक केली. न्यायालयाने संजय पांडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यापूर्वी सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने पांडे यांना अटक केली होती.

एक खासगी कंपनी आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने २००९ ते २०१७ या काळात भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या दूरध्वनी अभिवेक्षण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने जुलै २०२२ रोजी संजय पांडे यांचे निवासस्थान, तसेच कार्यालयांवर छापे घातले होते. तसेच संजय पांडे यांच्याबरोबरच त्यांच्या कंपनीच्या सध्याच्या संचालक पांडे यांची आई संतोष पांडे आणि मुलगा अर्मान पांडे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला होता.