मुंबई : अंधेरी – कुर्ला मार्गावर अनधिकृतरित्या उभ्या केल्या जाणाऱ्या टेम्पो आणि पाण्याच्या टँकरमुळे संबंधित मार्गावर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांना तासंतास वाहतूक कोंडीत ताटकळत राहावे लागते. याबाबत संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या असल्या तरीही समस्या जैसे थेच आहे.
अग्निशमन कार्यात अडथळा ठरणाऱ्या वाहनधारकांवर गुन्हा नोंदविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून त्यामुळे अवैध पार्किंगवर आळा बसेल, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान होईपर्यंत वाट पाहण्याऐवजी प्रशासनाने आधीच कठोर भूमिका घ्यायला हवी, असे मत देखील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
अवैध पार्कींगवर सरसकटपणे कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून अंधेरी – कुर्ला मार्गावर सातत्याने अनधिकृत टेम्पो व पाण्याचे टँकर उभे केले जात असल्याने वॉचडॉग फाउंडेशनने नाराजी व्यक्त केली आहे.
ही बाब एअरपोर्ट रोड वाहतूक विभागाच्या निदर्शनास येत असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप संस्थेने केला आहे. या अवैध पार्किंगमुळे वाहतूक विस्कळीत होत असून, सेवन हिल्स रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकांना विलंब होत आहे. तसेच, मरोळ येथील मुंबई अग्निशमन दलाच्या केंद्रातून आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी रवाना होणाऱ्या अग्निशमन दलाच्या बंबांनाही याच मार्गावरून जावे लागते. असे असूनही वाहनांवर कारवाई केली जात नाही.
गेल्या तीन वर्षांपूर्वी अंधेरीत पाण्याची समस्या नव्हती. मात्र, आता सातत्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकर्सचीही मागणी वाढली आहे. मात्र, पाण्याचे टँकर्स अवैधरीत्या रस्त्यावर उभे केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या समस्येबाबत एका वर्षांपूर्वी मोर्चाही काढण्यात आला होता. तसेच, वारंवार संबंधित विभागांकडे तक्रारी करण्यात येतात. मात्र, त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते, असा गंभीर आरोप गॉडफ्रे यांनी केला.

