मुंबई : होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना ‘’आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देत त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक आणि धोकादायक असल्याचा दावा करत इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) तीव्र विरोध केला आहे. तसेच हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आयएमएकडून देण्यात आला आहे.

आयुर्वेद अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून आता होमिओपॅथी डॉक्टरांना औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा सीसीएमपी हा ब्रीज कोर्स पूर्ण केल्यावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. मात्र हा निर्णय सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळणारा आहे. आपत्कालिन परिस्थितीमध्ये चुकीचे औषधोपचार, चुकीचे निदान झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे डॉक्टरांची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आयएमएने फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित असतानाही सरकारने १५ जुलै २०२५ पासून हा आदेश जारी करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचे आयएमएचे अध्यक्ष संतोष कदम यांनी सांगितले. राज्य सरकारने तातडीने हा निर्णय मागे न घेतल्यास आयएमएच्या सर्व शाखांच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

एमबीबीएस पूर्ण करणारे डॉक्टर पूर्णपणे वैज्ञानिक आणि पुराव्यावर आधारित उपचार पद्धती शिकतात. बीएचएमएस डॉक्टरांचे शिक्षण पूर्णपणे होमिओपॅथीवर आधारित आहे. त्यांना आधुनिक औषध, शस्त्रक्रिया किंवा आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थापनाचे वैज्ञानिक शिक्षण मिळत नाही. त्यामुळे जर अशा डॉक्टरला ‘आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता मिळाली तर सामान्य रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा आयएमएकडून करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे सीसीएमपी कोर्स

हा एक वर्षाचा ब्रिज कोर्स आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीचे ज्ञान मिळावे यासाठी तो तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रमातून औषधशास्त्राचे अगदी मर्यादित प्रमाणात मूलभूत ज्ञान मिळते. हा कोर्स कोणत्याही प्रकारे ५.५ वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या समतुल्य नाही.