मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील अनेक भागात किमान तापमानात वाढ होताना दिसते आहे यामुळे थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतो आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात दुपारच्या वेळेस उकाडा जाणवतो. राज्यातील कमाल तापमानात पुढील चार ते पाच दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार असून यामुळे उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात उत्तर कोकणासह मुंबई आणि रायगड मधील काही भागातही पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी कोकण पट्ट्यातील विविध भागात पहाटेच्या वेळी जरी गारवा जाणवला तरीही दुपारच्या वेळेस कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली असून त्यामुळे या भागात उकाडा जाणवणार आहे. मंगळवारी राज्यातील सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद रत्नागिरी येथे झाली. तेथील कमाल तापमान ३४.७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले तर राज्यातील सर्वोच्च किमान तापमानाची नोंद यवतमाळ येथे झाली. तेथील किमान तापमान १३ अंश सेल्सिअस होते.

मुंबईतही उकाडा वाढणार ?

मुंबईत सध्या धुरक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर धुरक्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. धुरकट वातावरणाचा परिणाम शहरातील हवेच्या गुणवत्तेवरही होताना दिसत आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार, मंगळवारी शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक १४० इतका म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. मंगळवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२ अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रात २० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर शहरातील कमाल तपमानातही वाढ होताना दिसते आहे.

सोमवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३३ अंश सेल्सिअस तर मंगळवारी ३२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे शहरात फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. बुधवारी शहरात ढगाळ आणि धुरकट वातावरण राहणार असून यादरम्यान कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहणार असून त्यामुळे उकाड्यात आणखीन वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.