मुंबई : यंदा ‘एल निनो’चा मोसमी पावसावर तीव्र परिणाम होणार असून यंदाच्या हंगामात सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला. यापूर्वीच्या अंदाजात ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र तो दोन टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. २०१५ मध्ये ८७ टक्के पाऊस पडला होता. त्यानंतर यंदाचा पावसाळा सर्वात कोरडा ठरण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे शेती उत्पादनावर परिणाम होऊन महागाईमध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून दुसर्या टप्प्यातील सुधारित अंदाज शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यात दीर्घकालीन अंदाज म्हणजेच जून ते सप्टेंबर या महिन्यात पर्जन्यमान कसे असेल, हे स्पष्ट करण्यात आले आहे. देशात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या दोन दशकांत २०१५ व्यतिरिक्त २००९ आणि २०१४ मध्ये मोसमी पावसाचे प्रमाण सरसरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी राहिले होते. यंदाच्या जून ते सप्टेंबर या काळातही कमी पर्जन्यमानाचा अंदाज आहे.
मध्य भारतातील मान्सूनच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा पावसाचा पट्टा ( मान्सून कोर झोन ) जो शेतीसाठी अत्यंत महत्वाचा मनाला जातो. या प्रदेशातही सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९४ टक्के होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस नेहमीच्या वेळापत्रकानुसार दाखल झाला तरी जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबण्याची शक्यता आहे. पेरण्या रखडल्या तर अन्नधान्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. पश्चिम आशियातील युद्धामुळे आधीच महागाईचे संकट निर्माण झाले असतानाच कमी पावसामुळे हे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
एल निनो स्थिती
तटस्थ स्थितीत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून १३ एप्रिल रोजी मोसमी पावसाचा पहिला अंदाज जाहीर केला होता. त्यात ‘एल निनो’ स्थिती जून महिन्यात विकसित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. हीच शक्यता कायम ठेवण्यात आली असून पुढील मोसमी पावसाच्या हंगामात जुलै- ऑगस्टमध्ये ‘एल निनो’ मध्यम स्थितीत तर सप्टेंबर महिन्यात ती अधिक तीव्र होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आठवडाभरात मोसमी वारे केरळमध्ये
आठवड्याभरात मोसमी वारे केरळ येथे दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे, असा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केला. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे नैऋर्त्य व आग्नेय अरबी समुद्राचे काही भाग, लक्षद्वीप परिसर तसेच बंगालच्या उपसागरातील उर्वरित भागात वाटचाल करण्यास अनुकूल स्थिती आहे, अशी शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात जूनमध्येही उकाडा?
’राज्यात यंदा सरासरीहून कमी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केली आहे.
’उन्हाच्या तीव्र झळांमुळे यंदा नागरिक हैराण झाले आहेत. जून महिन्यात उष्णतेत वाढ होईल, असा अंदाज असल्याने मोसमी पावसाच्या हंगामातही उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
’काही भागात सरासरीहून अधिक कमाल तापमानासह उष्णतेची लाटसदृश्य स्थिती राहील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली.
