मुंबई : सध्या मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कमी झाला आह़े मात्र, अधूनमधून सोसाटय़ाच्या वाऱ्यासह जोरदार सरी कोसळत असून, कोकण आणि घाटमाथ्यावर मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसल्यानंतर पुन्हा कडक ऊन पडत आहे. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात सोमवारी पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली.      दरम्यान, मंगळवारी आणि बुधवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडय़ात काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबईत हलक्या सरी : सोमवारी सकाळी ८.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत कुलाबा येथे २.८ मिमी पावसाची आणि २९ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे २.५ मिमी पावसाची आणि २९.३ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.