मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत ९९ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पाणीप्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे. गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे वार्षिक विघ्न टळले आहे.

जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे तलावांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. मात्र नंतर ऑगस्टमध्ये राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी नोंदवले गेले. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा धिम्यागतीने वाढत होता. त्यामुळे पाणीकपात करावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या दहा पंधरा दिवसात पडलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सातही तलावात मिळून ९९.२२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सातही तलावातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना वर्षभर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. तसेच तलावातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल यादृष्टीने पालिकेच्या जल अभियंता खात्याकडून नियोजन केले जाते. १ ऑक्टोबरला सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो.

पाणीसाठ्याची टक्केवारी

* उध्र्व वैतरणा        ९९.३६

* मोडक सागर        ९९.९९

* तानसा         ९९.१४

* मध्य वैतरणा        ९७.४४

* भातसा         ९९.५०

* विहार          १००

* तुळशी     १००