scorecardresearch

दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन; मुंबईत १६२ कृत्रिम तलावांची सुविधा

दीड दिवसाच्या गणपतींचे गुरुवारी उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. रात्री नऊ वाजेपर्यंत ३४ हजार १२२ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन; मुंबईत १६२ कृत्रिम तलावांची सुविधा
दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन

मुंबई : दीड दिवसाच्या गणपतींचे गुरुवारी उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. रात्री नऊ वाजेपर्यंत ३४ हजार १२२ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत दुपारपासूनच गुलाल उधळत, ढोल- ताशाच्या गजरात दीड दिवसाच्या गणेशाच्या विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. करोनामुळे दोन वर्षे विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या नव्हत्या. यंदा मात्र ही वाजतगाजत गिरगाव, जुहू, दादर सारख्या चौपाटय़ांसह कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले. रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण ३४ हजार १२२ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यात ३३ हजार ९६३ घरगुती तर, १०८ सार्वजनिक गणपतींचा समावेश होता.

यंदा कोणतेही निर्बंध नसले तरी महापालिकेने गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही १६२ कृत्रिम तलाव तयार केले होते. यामध्ये १३ हजार २९४ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मुंबई शहर व उपनगरात पालिकेच्या २४ विभागात ७३ नैसर्गिक स्थळी आणि १५२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेशमूर्ती व हरतालिकांच्या विसर्जनाची व्यवस्था केली होती.

 गतवर्षी  ११ सप्टेंबर २०२१ रोजी दीड दिवसांच्या एकूण ६ हजार १०२ गणेशमूर्तीचे व १४ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले होते. त्यापैकी कृत्रिम तलावांत ४१ सार्वजनिक गणेशमूर्तीचे व ३ हजार ५४८ घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते.

भाविकांसाठी  पालिकेचा पुढाकार..

विसर्जन स्थळी मुंबई महापालिकेने निर्माल्य कलश ठेवले होते. तर, समुद्र आणि खाडय़ांच्या ठिकाणी जीवरक्षक, मोटार नौेका, नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, वैद्यकीय मदत,  रुग्णवाहिका आदी  सुविधा केल्या होत्या. उंच मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Immersion one and a half day ganesha idol facility 162 artificial ysh

ताज्या बातम्या