या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनक्षेत्रालगतच्या गावांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत वनक्षेत्राजवळील संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपणाचा लाभ देणारी योजना राबवण्याचा व त्यासाठी मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावासही त्यांनी मंजुरी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये उपस्थित होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक- वनबलप्रमुख जी साई प्रकाश, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगांवकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. प्रवीण, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने हे दूरदृष्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याने निर्माण होणाऱ्या मानव वन्यजीव  संघर्षावर उपाययोजना सुचवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने यासंदर्भात आपले धोरण निश्चित करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत सध्या ९३९ गावांचा समावेश असून योजनेत आणखी काही गावांचा समावेश करण्यात यावा तसेच योजनेत स्थानिकांना उपयुक्त ठरणाऱ्या आणखी कोणत्या गोष्टी देता येतील याचा विचार केला जावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या गावाजवळ वाघांचा सातत्याने वावर आहे आणि त्यामुळे शेती करता येत नाही अशा शेतजमिनीमध्ये बांबू लागवड, फळझाड लागवड, चारा लागवड करता येऊ शकेल ज्या माध्यमातून शेतकऱ्याना उत्पन्नाचे साधन मिळू शकेल या दृष्टीनेही विचार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत वनालगत असलेल्या पाच संवदेनशील गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर वन सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २१८ ठिकाणी सोलर बोअरवेल तयार करून त्यावर खोदतळे निर्माण करण्यात यावेत, जेणेकरून या पाणवठ्यामुळे वन्यजीवांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल असे सांगून यासाठी लागणारा ६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात यावा असे सांगितले. जिल्ह्यात सहा ठिकाणी जंगल सफारी सुरू करण्यात आली असली तरी निसर्ग पर्यटनाला असलेला वाव लक्षात घेऊन आणखी स्थळांचा शोध घेतला जावा, असेही ते या वेळी म्हणाले.  ज्या गावानजीक  वाघांचा वावर आढळून येतो त्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येऊन त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात यावी. काही वाघांना रेडिओ कॉलर लावून त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात यावे, जेणेकरून लोकांना सजग करता येईल व मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल, असे ठाकरे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Implement solar fencing scheme for farmers chief minister instructions regarding villages akp
First published on: 23-09-2021 at 23:50 IST