मुंबई: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने, खासगी क्षेत्रातील येस बँकेतील १३.१९ टक्के भागभांडवली हिस्सा विकण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. जपानच्या सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला (एसएमबीसी) ही हिस्सा विक्री केली जाणार असल्याचे शेअर बाजारमंचांना सूचित माहितीवरून स्पष्ट होते.

स्टेट बँकेपाठोपाठ, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यासारख्या सात इतर आघाडीच्या बँकांकडून एकत्रितपणे येस बँकेतील एकत्रित २० हिस्सेदारी ही जपानच्या ‘एसएमबीसी’ला विकली जाणार आहे. स्टेट बँकेने धारण केलेले येस बँकेतील ४१३.४४ कोटी समभाग (१३.१९ टक्के हिस्सा) हे प्रति समभाग २१.५० रुपये दराने विकले जाणार आहेत. स्टेट बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या कार्यकारी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

या व्यवहारासाठी एकूण अंदाजे ८,८८८.९७ कोटी रुपये इतका मोबदला स्टेट बँकेला मिळणे अपेक्षित आहे. अधिग्रहणकर्त्याकडून सर्व नियामक आणि वैधानिक मंजुऱ्या मिळविल्यानंतर या व्यवहाराची पूर्तता होईल. मार्च २०२४ च्या तिमाहीत येस बँकेत स्टेट बँकेचा २३.९७ टक्के हिस्सा होता, जो या व्यवहारानंतर १०.७८ टक्क्यांपर्यंत घसरेल.

येस बँकेची १० टक्के झेप

या व्यवहाराच्या घोषणेनंतर, येस बँकेच्या समभागाने जवळपास १० टक्के झेप घेऊन, २० रुपयांपुढील पातळी गाठली. भारत-पाक दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या चिंतेने शेअर बाजार कोसळला असतानाही, येस बँकेच्या समभागांत लक्षणीय खरेदी दिसून आली. एसएमएफजी हा जपानमधील दुसरा सर्वात मोठा बँकिंग समूह असून, जागतिक स्तरावर त्याची मजबूत उपस्थिती आहे. या समूहाच्या जागतिक कौशल्याचा फायदा होऊन, येस बँकेच्या वाढ, नफा आणि मूल्य निर्मितीच्या पुढील टप्प्याला ते चालना देईल, असे येस बँकेने शेअर बाजारांना दिलेल्या सूचनापत्रात म्हटले आहे.