मुंबई : फोन टॅपिंगप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आरोपी बनवण्यात आले नसले तरी त्यांच्याविरोधात महत्त्वाचे तपशील हाती लागले असून त्याअनुषंगाने तपास केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात मांडण्यात आली.

फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला असून तो रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र या प्रकरणी शुक्ला यांचा आरोपी म्हणून अद्याप समावेशच केलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार त्यांना याप्रकरणी आरोपी करणार आहे की नाही, अशी विचारणा न्यायालयाने मागच्या सुनावणीच्या वेळी सरकारला केली होती. तसेच भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.   न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सोमवारी याप्रकरणी सुनावणी झाली.