मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात राजद्रोह, शांतता भंग आणि सार्वजनिक सलोख्याला बाधा आणल्याच्या आरोपांतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसेच ठाकरे यांना मशिदींवरील ध्वनिक्षेपक हटवण्याबाबत व हनुमान चालीसा पठणाबाबत पत्रकार परिषदा घेण्यास मनाई करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही जनहित याचिका केली आहे. ठाकरे यांच्या विविध जाहीर सभांमध्ये राज्यसभा सदस्य शरद पवार यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या मुद्दय़ाकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलने करू शकतात. परिणामी समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता असल्याची भीतीही याचिकेत उपस्थित करण्यात आली आहे.

मशिदींवरील ध्वनिक्षेपक ४ मे पूर्वी काढले गेले नाहीत, तर मशिदींसमोर ध्वनिक्षेपकावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे. औरंगाबाद पोलिसांनी ठाकरे यांच्याविरुद्ध दंगल घडवण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य करणे, गुन्ह्यास उत्तेजन देणे या आरोपांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मशिदींवरील ध्वनिक्षेपक हटवण्याबाबतचे ठाकरे यांचे भाषण समाजात फूट निर्माण करण्याच्या उद्देशाने होते, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे व ठाकरे यांच्यावर कारवाईचे संकेत दिल्याचेही याचिकेत म्हटले आहे. ठाकरे यांच्या मशिदींवरील ध्वनिक्षेपक हटवण्याच्या आणि हनुमान चालीसा पठणाच्या आवाहनामुळे राज्यातील शांतता भंग झाली आणि विविध भागात दंगलीचे वातावरण निर्माण झाले.