४० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत ३.८५ कोटी पळविले

सुरतहून मुंबईला आलेल्या ‘त्या’ बाबांनी आपल्या भक्ताकडे मुक्काम ठोकला. आठवडाभर पाहुणचार झोडल्यानंतर आपल्या ओळखीच्या बळावर तुम्हाला ४० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे या बाबांनी भक्ताला सांगितले. आपली विवंचना बाबा चुटकीसरशी सोडवतायत म्हटल्यावर भक्त हरखला, दिवसरात्र एक करून त्याने आपल्या नातेवाईकांकडून ३.८५ कोटी रुपये जमवले. पैसे आणि भक्ताला घेऊन बाबा निघाले, पण भक्ताला फसवून बाबांनी धूम ठोकली. अखेर ताडदेव पोलिसांनी उत्तर प्रदेशातून बाबाला अटक करून आणले.

ताडदेव येथे राहणारे हिरे व्यापारी चेतन केडिया यांची काही महिन्यांपूर्वी सुरतमध्ये विरेंद्रनाथ ब्रह्मचारी बाबा यांच्याशी ओळख झाली. अध्यात्मावर प्रवचने देणाऱ्या बाबांची ओळख अनेक ठिकाणी असल्याचे त्यांना कळले. ‘शक्तिशाली’ बाबांना आपल्या घरी आणावे, त्यांचा पाहुणचार करावा, त्यातून आपल्याला नक्कीच काहीना काही ‘फळ’ मिळेल असा विचार त्यांनी केला. एप्रिल महिन्याच्या अखेरीस केडिया यांनी विमानाची तिकिटे पाठवून बाबांना आपल्या घरी बोलावून घेतले. घरी आगमन झाल्यानंतर बाबांनी प्रवचन, निरुपण असे प्रकार सुरू केले. त्यानंतर केडिया यांना बाबांनी काही इच्छा असल्यास सांगण्यास सांगितले. केडियांनी आपल्याला व्यवसायात प्रगती साधायची असून त्यासाठी ४० कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगितले. बाबांनी ‘प्रसन्न’ होत, माझ्या अनेक बडय़ा बँकांमध्ये ओळखी असून हे कर्ज सहज मिळेल, असे सांगितले. पण त्यात एक मेख असल्याचे बाबांनी सांगितले. कर्ज मिळवण्यासाठी हमी म्हणून पाच कोटी रुपये बाबांनी मागितले. केडिया यांनी नातेवाईक-मित्र परिवाराकडून ३.८५ कोटी रुपये मिळवले. हे पैसे घेऊन बाबा त्यांना मंगळवार, ३ मे रोजी विलेपार्ले येथे निघाले. माझा आणखी एक भक्त तिथे असून तिथून आपण नवी मुंबईतील बँकेत जाऊन पैसे घेऊ असे सांगितले.

केडिया त्यांच्यासोबत गेले असता, विलेपार्ले येथील भक्ताला तुझी कार घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र, बाबा नवी मुंबईला गेलेच नाहीत. त्यांनी तू नवी मुंबईला जाऊन बँकेत थांब. मी मागून येतो असे सांगितले. केडिया पुढे निघाले, मागे बाबांनी अ‍ॅपआधारित टॅक्सी बोलावून धूम ठोकली. इकडे वाशीला पोहोचल्यावर बाबांनी सांगितलेली बँक अख्ख्या वाशीत नसल्याचे कळाले.

पोलिसांचे पथक फैजाबादला 

बाबांना फोन केला असता, मला पोलिसांनी पकडले असून मला फोन करू नकोस, असे सांगून त्यांनी भ्रमणध्वनी बंद करून ठेवला. काही तास उलटूनही भ्रमणध्वनी सुरू झाला नाही, तेव्हा केडिया यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ताडदेव पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार आल्यानंतर एपीआय कांदे आणि गुन्हे प्रकटीकरण कक्षाने बाबाचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचे ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश देवडे यांनी सांगितले. कौशल्यपूर्ण तपासानंतर बाबा आधी जम्मू येथील एका आश्रमात होते असे कळले. तिथून माहिती घेतल्यावर बाबांचे मूळ फैजाबाद असल्याचे कळाले. ताडदेव पोलिसांच्या पथकाने थेट फैजाबाद गाठत रविवार, ८ मे रोजी त्याला अटक केली.