मुंबई : परदेशी नागरिकला मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनवलोकनाला (एसआयआर) विरोध करणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचा अजिबात अधिकार नाही. याबाबत पूर्ण जाणीव असतानाही बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा एसआयआरविरोधातील आंदोलनात सहभागी झाला आणि त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी इमरानला फटकारले. तसेच, या चुकीसाठी विनाअट माफी सादर करण्याचे आणि भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नसल्याची हमी देण्याचे बजावले.
परदेशी नागरिक असतानाही लहानपणापासून इम्रान हा भारतात, तेही मुंबईत राहिला आहे. त्याचे शिक्षण येथेच झाले आहे आणि त्याने येथेच करिअर देखील केले आहे. तो येथील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. एवढे सगळे त्याला भारत आणि मुंबईने दिले तर त्याने आतापर्यंत भारतीय नागरिकत्व का घेतले नाही ? त्याने भारतीय नागरिकत्व घ्यावे आणि येथे हव्या त्या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने इम्रान याला सुनावले. भारतीय नागरिकाने अमेरिका अथवा जगातील अन्य कोणत्याही देशात अशाप्रकारे आंदोलनात सहभाग घेतला असता आणि तेथील सरकारवर टीका केली असती, तर लगेचच त्याची भारतात रवानगी झाली असती, असेही न्यायालयाने सुनावले.
परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून इमरान येथे वास्तव्याला आहे. त्यामुळे, त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे हे मान्य केले तरी आपण नेहमीच वसुधैव कुटुंबकमला महत्त्व दिले आहे. त्यामुळे, केंद्र सरकारने इम्रानला मोठया मनाने एक संधी द्यावी, अशी सूचना न्यायालयाने केंद्र सरकारला केली. त्याचवेळी इम्राननेही, तो येथे राहत आहे, तर त्याला येथील नियमांप्रमाणे राहावे आणि वागावे लागेल. परदेशी नागरिक असताना येथील सरकारवर तो टीका करू शकत नाही आणि त्याला तसा अधिकारही नाही. त्याने न्यायालयाकडून त्याच्याबाबत घेण्यात आलेल्या नरमाईचा गैरफायदा घेऊ नये असेही न्यायालयाने इम्रान याला बजावले. त्यानंतर इम्रान याने न्यायालयात माफीनामा सादर करून यापुढे अशी चूक करणार नसल्याचे हमीपत्र न्यायालयाला दिले.
दरम्यान, केंद्र सरकारने इम्रान याच्याबाबत नरमाईची भूमिका घेण्याला विरोध केला. तसेच, परदेशी नागरिक असूनही येथील सरकारवर टीका केल्याप्रकरणी त्याला भारत सोडून जावेच लागेल, अशी भूमिका घेतली. न्यायलयाने मात्र सरकारला इम्रानला एक संधी देण्याच्या सूचनेचा पुनरुच्चार केला.
दिलासा कायम
मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या निदर्शनात सहभाग घेऊन परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी इम्रान याला परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने (फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) बजावली काहे. या नोटिशील न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी स्थगिती दिली होती. हा दिलासा न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवली.
