मुंबई: धाराशीव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याप्रकरणी येत असलेल्या सर्व तक्रारींची पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

कैलास पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यातून पवनचक्की कंपन्याकडून शेतकऱ्यांची होणारी फसणुकीबाबत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना भोयर यांनी ही घोषणा केली. पवनचक्कीचे एजंट गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करतात, शेतकऱ्यांना चेक देतात, कामे करून घेतात, नंतर पण चेक बाऊन्स होतो. शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करुन खोटे संमतीपत्र तयार केले जाते. या सगळ्याची तक्रार घेऊन शेतकरी पोलिसांकडे गेले तर पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात असा आरोप कैलास पाटील यांनी केला.

कंपनीचे अधिकारी उघडपणे शेतकऱ्यां धमकावतात. आम्ही सगळ्यांना पैसे दिलेत, आमचे काही होणार नाही, जो शेतकरी विरोध करेल तो गायब होतो, अशी थेट धमकी देतात. पोलीस शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना मारहाण करतात. पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांना डांबून ठेवतात आणि पवनचक्की कंपन्या शेतकऱ्यांच्या शेतात काम करतात. एवढी हिंमत कशी येते, पोलीस काय करतात, सरकार अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार अशी विचारणा पाटील केली.

त्यावर शेतकऱ्यांच्या कंपन्यावरोधात ३१३ तक्रारी आल्या होत्या, त्यातील २१० तक्रारी निकाली निघाल्या आहेत, तर १०३ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. धाराशीव जिल्ह्यात जे प्रकार होतात त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आता या तक्रारींची त्या विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे भोयर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेक बाऊन्स प्रकरणातही कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील. तसेच खोटी संमतीपत्रे प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल.. ज्या पोीलस अधिकाऱ्याकडे हे काम असेल त्याच्याकडून हे काम काढून लवकरात लवकर याची चौकशी पूर्ण केली जाईल, असे आश्वासनही भोयर यांनी दिले.