मुंबईत महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक गंभीर घटना घडली आहे. बोरीवली पश्चिमेला मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हायस्कूलजवळ एका २३ वर्षाच्या महिलेचा अज्ञात बाईकस्वाराने तासाभरात दोनवेळा विनयभंग केला. एमएचबी कॉलनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ८.५० च्या सुमारास ही घटना घडली.

पीडित महिला व तिची मैत्रीण पिझ्झा शॉपमध्ये गेले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर ते संतवाणी रोडवरुन चालत असताना एक बाईकस्वार प्रचंड वेगात तिथे आला व त्याने पीडित महिलेच्या छातीला स्पर्श केला. या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा करण्यापूर्वीच हा बाईकस्वार तितक्याच वेगात तिथून निघून गेला. त्याने हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याचा चेहरा दिसला नाही.

या घटनेने मानसिक धक्का बसलेल्या त्या महिलेने लगेच घरी परतण्याचा निर्णय घेतला. ही महिला बोरीवलीत हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते. तिला वाटलं कि, आरोपी पळून गेलाय पण तो पूर्ण रस्ता तिचा पाठलाग करत होता. विनयभंग झाल्यानंतर २० मिनिटांनी पीडित महिला तिच्या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचली.

ती महिला इमारतीत प्रवेश करणार इतक्यात तो बाईकस्वार पुन्हा तिथे आला व त्याने पाठिमागून येऊन मिठ्ठी मारली व पळ काढला. त्यानंतर पीडित महिलेने तडक एमएचबी पोलीस स्टेशन गाठले व अज्ञात बाईकस्वाराविरोधात एफआयआर दाखल केला. आम्ही आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे पण बाईकचा रजिस्ट्रेशन नंबर सापडलेला नाही असे पोलिसांनी सांगितले.