तब्बल पाच सेकंदात एटीएम हॅक करून बँकांना लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार भांडुप मध्ये समोर आला आहे. भांडुप पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणात दोन जणांना भांडुप पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलं आहे.

आरिफ खान आणि तारीख खान, असं अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोन्ही हरियाणाचे रहिवासी आहेत. या दोघांना एटीएम मशीनमधून पैसे काढताना ट्रांजेक्शन झाल्यावर पाच सेकंदात ती मशीन हॅक कशी करायची याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ते एन. आर. सी कंपनीचे एटीएम असलेल्या बँका शोधून काढायचे. त्याठिकाणी जाऊन एटीएम पिन टाकल्यानंतर ट्रेमध्ये पैसे येताक्षणी ते एटीएम हॅक करायचे. ज्यामुळे बँकांच्या अकाउंटमध्ये या व्यवहाराची इंट्रीच व्हायची नाही आणि आरोपींना मात्र रोख रक्कम मिळायचे.

आतापर्यंत या दोघांनी विविध एटीएममधून दोन लाख 55 हजाराची रोख रक्कम हॅक करून काढली आहे. भांडुपमधील अभुदय बँकेच्या एटीएममध्ये एक इसम संशयास्पदरीत्या वारंवार ट्रांजेक्शन करत असल्याचं बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आलं. त्यावेळी त्यांनी त्याची चौकशी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी यानंतर त्याची उलट तपासणी करून त्याच्या आणखी एका साथीदाराला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं.

एटीएम सुविधा पुरविणाऱ्या एन. आर. सी कंपनीला या संदर्भात बँक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार या कंपनीने आपली सर्व एटीएम ही बंद केले आहेत. या दोघांनी नेमका आतापर्यंत बँकांना कितीचा गंडा घातला आहे, याचा अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत.