मुंबई : शाळांना उन्हाळ्याची सुट्टी पडल्यामुळे उत्तर प्रदेशमधून मुंबई दर्शनासाठी आलेल्या मुलाला पुन्हा गावाला नेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच तिकिट काढले. मात्र घाटकोपर दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या चंद्रमणी प्रजापती यांचा मृतदेह गावी नेण्याची वेळ आली, अशी खंत त्यांच्या पुतण्याने व्यक्त केली.

चंद्रमणी प्रजापती हे दिवा येथे राहत असून, ते दररोज विक्रोळीला रिक्षा चालविण्यासाठी येत होते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ते रिक्षा चालविण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र साध्याकाळपर्यंत ते घरीच आले नाहीत. दरम्यान, विक्रोळीमधील त्यांच्या एका मित्राचा दूरध्वनी आला. आपल्याला राजावाडी रुग्णालयातून दूरध्वनी आला होता. घाटकोपर दुर्घटनेत चंद्रमणी प्रजापती सापडले असून, त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आल्याचे त्यांच्या मित्राने सांगितले. त्यामुळे चंद्रमणी प्रजापती यांच्या पुतण्याने भांडुप येथील कार्यालयतून थेट राजावाडी रुग्णालयात धाव घेतली. तेथे पोहचल्यावर त्याला चंद्रमणी यांचे निधन झाल्याचे समजले.

हेही वाचा : नवजात बालकांचे छत्र हरपले; सचिन यादव, दिलीप पासवान यांचा झाला मृत्यू

चंद्रमणी प्रजापती यांचे कुटुंब उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्यास असून, दिवा येथे चंद्रमणी आणि त्यांचे बंधू व पुतण्या एकत्र राहत होते. चंद्रमणी यांना एक मुलगा व दोन मुली असून, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलगा मुंबईत आला होता. त्याला ते गावी घेऊन जाणार होते. त्यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वीच रेल्वेचे तिकिट काढले होते. तसेच गावी येत असल्याचेही त्यांनी कळविले होते, असेचंद्रमणी प्रजापती (४५) यांचा पुतण्या अमरेश प्रजापती (३०) याने सांगितले.