मुंबई: रस्त्यावर फलक लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरधाव वेगात असलेल्या एका बीएमडब्ल्यू मोटारगाडीने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी पहाटे मुलुंड परिसरात घडली. या अपघातात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.

मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ शनिवारी पहाटे ही घटना घडली. तेथील मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मंडळाचे फलक लावत होते. त्याचवेळी भरधाव वेगात एक बीएमडब्लू मोटारगाडी मुलुंड पूर्वेकडे जात होती. त्यावेळी चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्या गाडीने दोघांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाने मदत न करताच घटनास्थळावरून पोबारा केला.

हे ही वाचा…प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा दोन वर्षांत आठ लाखांपेक्षा अधिक मातांनी घेतला लाभ!

मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच प्रीतम थोरात यांचा मृत्यू झाला होता. प्रसाद पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.