मुंबई : ऑटिझम आजाराने ग्रस्त १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पीडित मुलीच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी दोन आरोपींविरोधात विनयभंग व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पीडित मुलगी ऑटिझम आजाराने ग्रस्त असून हा प्रकार २८ एप्रिलला घडला होता. पीडित मुलगी बागेत गेली असताना तिच्या १६ वर्षांच्या मित्राने तिचा विनयभंग केला. तसेच आणखी एका आरोपीने पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन केले. याबाबतची माहिती पीडित मुलीने नुकतीच तिच्या आईला दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने गुरूवारी याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७९, ३ (५) व पोक्सो कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गेल्या महिन्यात पीडित मुलीबाबत गैरप्रकार घडला होता. नुकतीच पीडित मुलीच्या कुटुंबियांकडून तक्रार करण्यात आली. याप्रकरणातील एक आरोपी १६ वर्षांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींना भारतीय नागरी सुरक्षा कायदा कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्याअंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. मुंबईत २०२४ मध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे. २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. या प्रमाणात २०२४ मध्ये घट झाली असून हे प्रमाण २०२४ मध्ये ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घडनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचित व्यक्ती आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपींचा समावेश असल्याचेही निष्पन्न झाले होते.