मुंबई : मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या रस्त्यांच्या कामांच्या महानिविदेपैकी ४९ टक्के कामे ३१ मे पर्यंत पूर्ण झाली आहेत. एकूण १३८५ रस्त्यांची कामे म्हणजेच ३४२ किमी लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने एकूण सुमारे ७०० किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण हाती घेतले होते. त्यापैकी ४९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत .उर्वरित कामे पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात हाती घेण्यात येणार आहेत.
मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने रस्ते कॉंक्रीटीकरण केले जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने कॉंक्रीटीकरणाच्या तब्बल १२ हजार कोटींच्या महानिविदा काढल्या होत्या. दोन टप्प्यात ही कामे सुरू आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे जाने २०२३ मध्ये सुरू झाली, तर दुसऱ्या टप्प्यातील कामे ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाली. रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटकरण पूर्ण करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात व त्यामुळे मुंबई महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका होत असते. काँक्रीट रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परिरक्षणाचा खर्च देखील कमी होणार आहे. तसेच, काँक्रीट रस्ते दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळावे याकरीता मुंबई महापालिकेने रस्ते कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. गेल्या काही वर्षात मुंबईतील १३३३ किमी रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण आधीच झाले आहे. तर आणखी सुमारे ७०० किमी लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रीटकरण दोन टप्प्यात होणार आहे.
रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाअंतर्गत टप्पा १ आणि टप्पा २ मध्ये एकूण मिळून २,१२१ रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ६९८.४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. पैकी, ३१ मे २०२५ अखेर ठरलेल्या मुदतीत १,३८५ रस्त्यांची मिळून ३४२.७४ किलोमीटरची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. म्हणजेच पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
आयआयटीची देखरेख
सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. काँक्रीट मिश्रण प्रकल्पात मिश्रण बनविण्याच्या टप्प्यापासून ते काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंतच्या विविध चाचण्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. त्यात क्यूब टेस्ट, कोअर टेस्ट, ड्युरॅबिलीटी टेस्ट, फिल्ड डेन्सिटी टेस्ट आदी विविध तांत्रिक चाचण्यांचा समावेश असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
टप्पा १ अंतर्गत ३२०.०८ किलोमीटर लांबीच्या ७०० रस्त्यांचे काँक्रीटीकरण काम हाती घेण्यात आले. एकूण ७०० पैकी ५८२ रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून त्यांची एकूण लांबी २०३.३६ किलोमीटर आहे. या निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ६३.५३ टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे.
टप्पा २ अंतर्गत ३७८.३६ किलोमीटर लांबीच्या १४२१ रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. ३१ मे २०२५ पर्यंत एकूण १३९.३८ किलोमीटर लांबीच्या ८०३ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ३६.८४ टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे.
कॉंक्रीटीकरण झालेला रस्ता खोदण्यास मनाई
रस्त्यांची कामे पूर्ण करताना महानगरपालिकेचा जल अभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मलनिःसारण प्रकल्प आदी विविध विभाग आणि उपयोगिता सेवा वाहिन्यांशी संबंधित यंत्रणा विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांच्यासमवेत समन्वय ठेवण्यात आला आहे. काँक्रिटीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यांवर कोणत्याही संस्थेस खोदकाम, चर करायला मनाई करण्यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेतर्फे खोदकामास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.