मुंबईतील जवळपास ५० रुग्णालयांना बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय परिसरात बॉम्ब स्कॉडदेखील तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा – आरटीई कायद्यातील दुरुस्तीला स्थगितीचे प्रकरण : दीड महिन्यांपासून प्रतिज्ञापत्र दाखल न करणाऱ्या सरकारला उच्च न्यायालयाचे खडेबोल

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीपीएनचा वापर करत या रुग्णालयांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. ज्या रुग्णालयांना हा धमकीचा ईमेल प्राप्त झाला, त्यामध्ये जसलोक रुग्णालय, रहेजा रुग्णालय, सेव्हन हिल रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय, केईएम रुग्णालय, जेजे रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय यांसारख्या मोठ्या रुग्णालयांचा समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे ईमेलची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह या रुग्णालयांमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र, याठिकाणी पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. यासंदर्भात बोलताना, आम्ही याप्रकरणाचा तपास सुरु केला असून ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जातो आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पालिकेची कारवाई मोहीम, मंगळवार रात्रीपासून सुरुवात

दिल्लीतील रुग्णालयांनाही मिळाली होती धमकी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्लीतही अशाच प्रकारे रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्ब हल्लाची धमकी देण्यात आली होती. ज्यामध्ये जीटीबी रुग्णालय, दादा देव रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय आणि दीप चंद्र बंधू रुग्णालय या महत्त्वाच्या रुग्णालयांचा समावेश होता. धमकी ईमेल मिळताच दिल्ली पोलिसांनी या रुग्णालयात दाखल होत तपासही केला होता. मात्र, त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आठळून आली नव्हती.