मुंबईः महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या तपास करणाऱ्या महिला अत्याचार विरोधी शाखा (सीएडब्ल्यू) विभागात ६२ टक्के पदे रिक्त आहेत. गंभीर बाब म्हणजे येथील मंजूर उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त दोन्ही पदे रिक्त आहेत. याशिवाय पोलीस निरीक्षकाच्या दोन मंजूर पदांपैकी एक पद रिक्त आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्ष पदाच्या १२ मंजूर जागांपैकी ८ पदे रिक्त आहेत. तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांपैकी पोलीस हवालदार, पोलीस शिपाई यांच्या ६१ मंजूर पदापैकी ३७ पदे रिक्त आहेत.

यंग व्हिसलब्लोअर फाउंडेशनचे जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती प्राप्त झाली आहे. महिलांविरोधातील अत्याचाराबाबतच्या गंभीर घटनांचा लवकर तपास व्हावा यासाठी विशेष कक्ष असावा या उद्देशाने सीएडब्ल्यूची स्थापना करण्यात आली होती. पण आता या विभागात गुन्ह्यांचा तपास होत नाही. टपाल विभागाप्रमाणे त्यांना प्राप्त तक्रारी विविध पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी पाठवल्या जातात. जानेवारी २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत सीएडब्ल्यूच्या कक्ष १ ला बलात्कार, अपहरण व विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांच्या २३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ५० प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहे. उर्वरित १४४ तक्रारी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्या आहेत, तर ४ चौकश्या प्रलंबित आहेत. कौटुंबिक हिंसाचार, हुंडा बळी, खून, आत्महत्या व इतर तक्रारींचा तपास सुरू आहे. याशिवाय कक्ष – २ ला जानेवारी २०२० ते एप्रिल २०२४ या कालवधीत १६८८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी २७३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. त्यातील ३०७ प्रकरणांचा तपास बंद करण्यात आला आहे. तर १०७७ प्रकरणे पुढील चौकशीसाठी स्थानिक पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. तर ३१ प्रकरणे प्रलंबीत आहेत.

हेही वाचा : वडाळा – परळदरम्यानच्या जलबोगद्याचे खणन पूर्ण, प्रकल्प पूर्ण होण्यास एप्रिल २०२६ ची मुदत

चार वर्षात एकाच प्रकरणात आरोपी दोषी

जानेवारी २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत या विभागाने तपास केलेल्या केवळ एका प्रकरणात आरोपीला शिक्षा मिळाली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये आरोपीची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

हेही वाचा : मुंबईतील नाल्यांतून उद्दिष्टापेक्षा अधिक गाळ उपसा, पालिका प्रशासनाचा दावा; वडाळ्यामधील नाल्यातील तरंगता कचरा पुन्हा काढणार

पाच महिन्यात २५८४ गुन्हे

मुंबईत यावर्षी महिलांविरोधात २५८४ गुन्हे घडले आहेत. त्यात बलात्कार, विनयभंग, छेडछाड यांसारख्या गुन्ह्यांचा सहभाग आहे. त्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गेल्यावर्षी या काळात अडीच हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.