मुंबईः दिवे लावण्यावरून झालेल्या वादातून वयोवृद्धाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार पायधुनी परिसरात शनिवारी घडला आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम इस्तियाक शेख असे मृत व्यक्तीचे नाव असून आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी युनूस इस्तियाक शेख (५८), सोहेल युनूस शेख, २६ व अजीज जमील शेख(४१) यांना अटक केली. व्यवसायाने शिंपी असलेल्या इद्रिस इस्तियाक शेख (५४) यांच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायधुनीयेथील आरआर रोडवरील अलीझलाला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शेख कुटुंबाची वडिलोपार्जित घर आहे. त्या घरात तक्रारदार इद्रिस शेख व त्यांचा भाऊ युनूस शेख हे कुटुंबासह राहतात. इद्रिसच्या बहिणींची मुलेही तेथे राहतात. त्याशिवाय अहमदनगर येथील रहिवासी असलेला इद्रिसचा मोठा भाऊ सलीम मुंबईत दम्यावरील उपचार घेत असल्याने पत्नीसह घरी येत असे. गेल्या दोन दिवसांपासून सलीम आणि त्याची पत्नी घरातच राहत होते. हेही वाचा : मुंबईतील रस्ते वाहतूक विस्कळीत होणार, १ ऑगस्टपासून शीव उड्डाणपूल बंद या घराच्या मालकी हक्कावरून त्यांच्यात वाद आहेत. त्यामुळे घऱाचे बडद्याद्वारे विभाजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री सर्वजण झोपी गेले. शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घरातील दिवे लावण्यावरून त्यांच्यात वाद झाले. त्यात सलीम यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यादरम्यान सलीम यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने जेजे. रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपींना पायधुनी पोलिसांनी अटक केली. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०५ (हत्येची रक्कम नसून दोषी हत्या) आणि ३(५) (सामान्य हेतू) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.