मुंबई : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून दोन हजारांहून अधिक गुंतवणुकदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा सनदी लेखापाल (सीए) अंबर दलालविरोधात शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले. दलालविरोधात ४४ हजार पानांचे आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. दलालने फसवणूक केलेल्या व्यक्तींमध्ये देशातील नागरिकांसह अमेरिका, दुबईतील अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे. तक्रारदारांमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याचाही समावेश आहे.

मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रोजी रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्याविरुद्ध सुरुवातीला डझनभर गुंतवणुकदारांची ५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढली असून आतापर्तंय २००९ तक्रारदार आर्थिक गुन्हे शाखेकडे आले आहेत. आरोपींनी त्यांची एकूण ११०० कोटी रुपयांची फसवणूक केली. आहे.

हेही वाचा : पोर्शे अपघात प्रकरण: अपघातामुळे अल्पवयीन आरोपीवरही मानसिक आघात, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एका मैत्रिणीने मुख्य तक्रारदार मलकानी यांची आरोपी अंबर दलालशी ओळख करून दिली होती. त्याने त्यांना गुंतवणुकीवर आकर्षक नफा देऊ केला. तसेच प्रत्येक महिन्याला १.५ ते १.८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदार महिलेने गुंतवणूक केली आणि तिला वचन दिलेले परतावे मिळाल्यावर तिने आणखी गुंतवणूक केली. आरोपीने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत अनेकांची फसवणूक केली. त्याला देहरादून येथून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी दलालच्या मालमत्तांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने माहिती घेतली असून आतापर्यंत अंबर दलालच्या १७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे.