मुंबई : अरबी भाषा शिकवण्यासाठी घरी आल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी आता १७ वर्षांची असून तिने शाळेतील समुपदेशनादरम्यान १० वर्षांपूर्वी आरोपीने केलेल्या अत्याचारांची माहिती दिली. त्यानुसार, शाळेने दिलेल्या तक्रार अर्जाच्या आधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी ही कारवाई केली.
पवईतील एका नामांकित शाळेने २४ ऑक्टोबर रोजी पवई पोलिसांना एक तक्रार अर्ज दिला. शाळेमध्ये १२ इयत्तेत शिकत असलेल्या १७ वर्षांच्या मुलीवर १० वर्षांपूर्वी आरोपीने केलेल्या अत्याचाराची माहिती त्यात दिली होती. पवई पोलिसांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
पीडित अल्पवयीन मुलगी सात ते आठ वर्षांची असताना आरोपी तिला अरबी भाषा शिकवण्यासाठी त्यांच्या घरी येत होता. हा आरोपी शिकवणीदरम्यान तिला भाषेचा एक टास्क द्यायचा. मुलीने टास्क पूर्ण न केल्यास आरोपी तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. आरोपी शिक्षक असल्याने भीतीपोटी तिने याबाबत वाच्यता केली नाही. मात्र, शाळेतील समुपदेशानादरम्यान तिने याबाबत माहिती दिली.