मुंबई: महायुती सरकारने महालक्ष्मी रेसकोर्सचे व्यवस्थापन करणाऱ्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला (आरडब्ल्यूआयटीसी) भाडेतत्त्वावर दोन कोटी रुपयांची जशी सवलत दिली तशीच सवलत मुंबईतील इतर स्पोर्ट्स क्लब आणि जिमखान्यांना आकारल्या जाणाऱ्या भाडे दरामध्ये द्यावी अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक ॲड्. मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून स्पोर्ट्स क्लब आणि इतर जिमखान्यांना भाडेतत्त्वावर महालक्ष्मी रेसकोर्सप्रमाणे भाडे आकारणी करावी, अशी मागणी केली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जागा आणि सागरी किनारा मार्गालगतची १८० एकर जागा वापरून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारण्यात येणार आहे. रेसकोर्सची उर्वरित ९१ एकर जागा ३० वर्षांसाठी शासकीय भाडेपट्ट्याने टर्फ क्लबकडे देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेताना रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचे भाडे तीन कोटींवरून एक कोटी केले आहे. जमिनीचे भाडे दोन कोटी रुपयांनी कमी केले आहे. रेसकोर्सच्या बांधकाम असलेल्या जागेवरच भाडे आकारणी केली जाईल आणि खुल्या जमिनीवर करणार नसल्याचे राज्य सरकारने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. हेही वाचा : Worli hit and Run: वरळीतल्या त्या भयंकर अपघाताच्या आधी काय काय घडलं? काय होता घटनाक्रम? स्पोर्ट्स क्लब आणि जिमखान्यांसाठी एक आदर्श धोरण तयार केले पाहिजे जेणेकरून कोणत्याही स्पोर्ट्स क्लब किंवा जिमखान्यावर अन्याय होणार नाही, असे मत नार्वेकर यांनी मांडले आहे. इतर क्लब आणि जिमखान्यांना बांधकाम नसलेल्या क्षेत्रांसह संपूर्ण भूखंडांवर भाडे आकारणी असल्याने त्यांना अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याची इतर क्बल आणि जिमखाना व्यवस्थापनांना वाटते आहे. त्यामुळे कोणताही पक्षपात न करता समान भाडे आकारणी करील असे धोरण तयार करण्याची मागणी नार्वेकर यांनी केली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर मुंबईत कोणतेही बांधकाम न करता १२० एकर जागेत सेंट्रल पार्क उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने घेतला असून उर्वरित ९१ एकर जागा रेसकोर्स व्यवस्थापनाला ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुनर्विकास योजनेत ॲमॅच्युअर रायडर्स क्लबचे (एआरसी) पुनर्वसन करण्याची मागणीही नार्वेकर यांनी केली आहे. हेही वाचा : इंटरनेट गेमिंगच्या व्यसनामुळे परीक्षा बुडली; बारावीची फेरपरीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, गुणवृद्धी परीक्षेला बसण्यास परवानगी इतर जिमखान्यानी महालक्ष्मी रेसकोर्सपेक्षा जास्त भाडे मुंबईत विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब, हिंदू जिमखाना, पारसी जिमखाना, कॅथोलिक जिमखाना, बॉम्बे जिमखाना, इस्लाम जिमखाना आणि इतर अशा जिमखाना आणि क्लबसाठी वेगवेगळा नियम का आहे असाही सवाल नार्वेकर यांनी केला आहे. या सर्वांचे त्यांच्या जमिनीवर महालक्ष्मी रेसकोर्ससारखे अत्यल्प बांधकाम आहे आणि त्यांनी शहराच्या सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांनाही रेसकोर्स व्यवस्थापनाप्रमाणे कमी भाडे आकारणी करावी अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.