मुंबई : गेल्या काही वर्षांत शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या दुकाने, हॉटेल्स आणि गोदामे उभारण्यात आली असून येथील सेकडो अनधिकृत बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी कारवाईदरम्यान जमीनदोस्त केली.
गेल्या काही वर्षात भूमाफियांनी दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीअंतर्गत असलेले मानखुर्द येथील बालसुधारगृह आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २५ एकरहून अधिक जागेवर कब्जा केला आहे. सध्या या जागेवर अनधिकृत दुकाने, बार, लग्नाचे हॉल आणि गॅरेज सुरू आहेत. याबाबत अनेक तक्रारी करूनही शासनाकडून कारवाई करण्यात येत नव्हती. याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये वृत्ताची मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. या या वृत्त मालिकेची दाखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी येथे तोडक कारवाईला सुरुवात केली.
मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरातील ५० हून अधिक अनधिकृत दुकानांवर शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास कारवाई करण्यात आली. त्यांनतर मानखुर्द बालसुधारगृहाला लागून असलेली अनेक हॉटेल्स आणि गोदामांवर कारवाई करत ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी या कारवाईला माफियांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई सुरूच ठेवण्यात आली होती.