मुंबई : ॲण्टॉप हिल परिसरात स्मशानभूमीच्या शेजारी असलेली दहा फिरती शौचालये गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पालिकेच्या कंत्राटदाराने ॲण्टॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

एका बाजूला मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कचरा जाळू नये म्हणून नागरिकांना आवाहन केले जात आहे. पालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी कंबर कसली आहे. मात्र ॲण्टॉप हिल परिसरात तब्बल एक दोन नाही तर दहा शौचालये अज्ञात इसमांनी जाळून टाकल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रदूषणाबरोबरच सामाजिक स्वरुपाच्या गुन्हयाचीही गंभीर घटना घडली आहे. ॲण्टॉप हिल परिसरातील गोवारी स्मशानभूमीवर गेट क्रमांक चार जवळ ही घटना घडली.

हेही वाचा : सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पालिकेने या परिसरात शौचालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले असून रहिवाशांच्या सोयीसाठी तात्पुरती शौचालये कंत्राटदाराने उभी केली होती. मात्र ती तात्पुरती शौचालये जाळून टाकण्यात आली आहेत. तेथे दहा शौचकूप होते. ते सगळे दहाही शौचकूप असलेले फायबरचे शौचालय जाळून टाकले आहे. आगीत शौचालय पूर्णत: जळून खाक झाले आहे. रस्त्याच्या कडेला असलेली ही शौचालये जाळण्यात आली असली तरी ती कोणी जाळली याबाबत कळू शकलेले नाही. या प्रकरणी अज्ञात इसमांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Story img Loader