मुंबई : गोरेगाव (प.) येथे डंपरने धडक दिल्यामुळे ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीचे २०१७ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते. तेव्हापासून महिला १२ वर्षीय मुलाचा सांभाळ करत होती. महिला कामावर गेली असता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणूक होईपर्यंत संकुलात आंदोलन, मोर्चा, कार्यक्रमास बंदी; ‘टिस’कडून परिपत्रकाद्वारे नियमावली जाहीर

मृत महिलेचे नव अर्जना आंबेकर असून त्या गोरेगावमधील लक्ष्मी नगर येथे रहायच्या. हा अपघात गोरेगावमधील न्यू लिंक रोड येथील शास्त्रीनगर परिसरात गुरूवारी झाला. त्या घरकाम करून स्वत:च्या कुटंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. त्या नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता कामावर गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजता काम संपल्यानंतर त्या घरी परतत होत्या. यावेळी विबगोर हायस्कूलसमोर रस्ता ओलांडत असताना त्यांना जोगेश्‍वरीच्या दिशेने जाणार्‍या एका डंपरने जोरात धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना स्थानिक रहिवाशांनी तातडीने ऑस्कर रुग्णालयामध्ये दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपी डंपरचालक अमर किसन घायवट याला नागरिकांनी पकडून बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपी चालकाला जामीन मिळाला आहेे.