मुंबईः लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर नऊ दिवसांनी गुरुवारी वनराई पोलिसांनी मुंबई उत्तर – पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मतमोजणी केंद्रात मोबाइल घेऊन गेल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एक आरोपी नवनिर्वाचीत खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक आहे.

हेही वाचा : मुंबईतील चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयातील हिजाब बंदीविरोधात विद्यार्थिनींची उच्च न्यायालयात धाव

अपक्ष उमेदवार लता शिंदे यांचे प्रतिनिधी एम. पंडिलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच त्यांना मोबाइल नेण्यास परवानगी देणाऱ्या मतदान कर्मचारी दिनेश गुरव यांच्याविरोधातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि व लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्व येथील नेस्को मैदानावर ४ जून रोजी ही घटना घडली. निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात मोबाइल नेण्याची परवानगी नव्हती. त्यानंतरही त्यांनी मतमोजणी केंद्रात मोबाइल नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुन्हा दाखल करण्यात आलेले पंडीलकर हे नवनिर्वाचीत खासदार रवींद्र वायकर यांचे नातेवाईक आहेत. याप्रकरणी वनराई पोलीस पुढील तपास करीत आहेत.