मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून बनावट व्हॉटस ॲप खाते तयार करण्यात आल्याची तक्रार महाराष्ट्र्र सायबर पोलिसांकडे दाखल झाली आहे. या बनावट व्हॉटस ॲप खात्याच्या माध्यमातून अनोळखी व्यक्ती ही आपणच प्रफुल्ल पटेल असल्याचे भासवत आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याद्वारे महाराष्ट्र्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : आषाढीनिमित्त ९.५३ लाख भाविकांचा एसटी प्रवास, एसटीच्या तिजोरीत २८.९२ कोटी रुपयांची भर

प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बनावट व्हॉटस ॲप खाते तयार केल्याचे तक्रारदार विवेक अग्निहोत्री यांना एका कार्यकर्त्याकडून २० जुलै २०२४ रोजी समजले. त्यानंतर तक्रारदाराने नमूद धूरध्वनी क्रमांक हा ‘ट्रू कॉलर’ या ॲपवर तपासून पाहिला आणि त्यावर प्रफुल्ल पटेल यांचे छायाचित्र असल्याचे आढळून आले. तसेच, व्हॉटस ॲपवर प्रफुल्ल पटेल यांचे नाव आणि छायाचित्र वापरल्याचे आढळून आले आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बनावट व्हॉटस ॲप खाते उघडण्यात आल्याची तक्रारदाराला खात्री झाली. त्याने तात्काळ या बनावट खात्याचे स्क्रीनशॉट्स काढले. या सर्व प्रकरणाबाबत तक्रारदाराने प्रफुल्ल पटेल यांना तात्काळ माहितीही दिली आणि महाराष्ट्र्र सायबर पोलिसांकडे २३ जुलै रोजी तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी संबंधित अनोळखी मोबाइल धारकाविरुद्ध ०८/२०२४ कलम – ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही अनोळखी व्यक्ती अद्याप सापडली नसून महाराष्ट्र्र सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे करीत असून ही कारवाई महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव आणि महाराष्ट्र सायबरचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.