मुंबई : प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळ्यात पनवेल-नांदेडदरम्यान ४० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत पनवेल – नांदेडदरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गाडी क्रमांक ०७६२६ द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २३ एप्रिल ते २७ जून या कालावधीत दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी २.३० वाजता पनवेल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता हुजूर साहेब नांदेड येथे पोहोचेल.

हेही वाचा : दादर रेल्वे स्थानकावर लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड, पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी

गाडी क्रमांक ०७६२५ द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २२ एप्रिल ते २६ जूनदरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी रात्री ११ वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा येथे थांबे असतील. या विशेष रेल्वेगाडीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. या उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांसाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.