मुंबईः दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी हॉटेल व्यावसायिकाकडे २५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली लघुवाद न्यायालयातील अनुवादक दुभाषिक विशाल सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली. त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : विकासकांकडील वसुलीसाठी ‘महारेरा’कडून लवकरच स्वतंत्र यंत्रणा!

याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या हॉटेलच्या मालकी हक्काबाबत धोबी तलाव येथील लघुवाद न्यायालयात दावा दाखल आहे. या दाव्याचा निकाल अंतिम टप्प्यात प्रलंबित आहे. या दाव्याचा निकाल बाजूने लावून देतो असे सांगून आरोपी लोकसेवक विशाल सावंत यांनी तक्रारदाराकडे २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतबंधक विभाग, मुंबई कार्यालय येथे तक्रार केली. तक्रारीची ९ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात सावंत यांनी तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने याप्रकरणी तात्काळ सापळा रचला. त्यात २५ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना सावंत यांना पकडण्यात आले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करीत आहे.