मुंबई : बदलापूर दुर्घटनेतील आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर मुंबईत काही ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे फलक लावण्यात आले आहेत. दहिसरमध्ये लावलेले हे फलक पालिकेच्या विभाग कार्यालयाने हटवल्यानंतर भाजपच्या आमदार मनीषा चौधरी अधिकाऱ्यांवर संतापल्या. तसेच हे फलक पुन्हा लावावे, फलक काढण्याचे आदेश कोणी काढायला सांगितले, असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
बदलापूर दुर्घटनेतील आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी या घटनेच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आले आहेत. तसेच समाजमाध्यमांवरूनही अभिनंदनाचा मजकूर फिरत आहे. ‘बदलापूरा…’ असे नमुद केलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचे हातात बंदूक घेतलेले छायाचित्रही आहे. असेच बॅनर उत्तर मुंबईतील बोरिवली भागात लावण्यात आले होते. मात्र पालिकेच्या आर उत्तर विभागाने हे बॅनर बुधवारी हटवले. त्यामुळे मनीषा चौधरी चांगल्याच भडकल्या. त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून खडसावले. बॅनर काढायला कोणी सांगितले, हे फलक पुन्हा लावा अशीही मागणी त्यांनी केली. याबाबत चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, फलक काढत असतानाचे पुरावे आहेत. पालिका अधिकारी हे फलक पुन्हा लावणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.
याबाबत आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, पोलीस दलाकडून आम्हाला निर्देश आले होते. या फलकांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे फलक काढावे असे निर्देश पोलिसांनी दिले होते. त्यानुसार आम्ही हे फलक काढले. बोरिवली एस. व्ही. रोड, करीअप्पा ब्रीज अशा मुख्य रस्त्यावरील हे फलक काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.