मुंबई : अंधेरी परिसरात गस्तीदरम्यान अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून एमआयडीसी पोलिसांनी एमडी या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा छडा लावला. पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे मंगळवारी छापा टाकून ११ लाखांचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ४ दिवसांत केलेल्या कारवाईत २२ लाखांचे एमडी जप्त केले. पालघर येथील एका प्रयोगशाळेत हे अमली पदार्थ तयार करण्यात येत होते.
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र खांगळ यांना ७ जून रोजी अंधेरीमधील महाकाली रोडवर एक वाहन संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जाताना दिसले. पोलिसांच्या पथकाने कानोसा जंक्शन येथे हे वाहन अडवले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात ७१ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) आणि पावणेतीन लाख रुपयांची रोकड आढली.
याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकल फरहान खानला (३६) ताब्यात घेतले. खान याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल असल्याचे आढळले. त्याची चौकशी केली असता अमली पदार्थांच्या व्यवहाराचा उलगडा झाला. या चौकशीत पालघर येथील वाहनचालक प्रतिक जाधव (२४) खानला अमली पदार्थ पुरवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पालघर येथे छापा टाकून प्रतिक जाधवला अटक केली. त्याच्याकडून ८ लाख ६० हजार रुपये किंमतीचे २१५ ग्रॅम एमडी जप्त केले.
पोलिसांनी प्रतिक जाधवची चौकशी केली असता त्यात अमली पदार्थ तयार करणाऱ्या विजय खटकेचे (४३) नाव समोर आले. खटके हा रसायनशास्त्रातील द्विपदवीधर असून तो पालघऱ जिल्ह्यातील तारापूर येथील प्रोकॅम फार्मास्युटिक्लस प्रयोगशाळेत अमली पदार्थ तयार करीत असल्याचे समजले. पोलीस पथकाने या प्रयोगशाळेवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख रुपये किंमतीचे २८० ग्राम एमडी जप्त केले.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एमआयडीसी पोलिसांनी २२ लाख ६४ हजार रुपये किंमतीचे ५६६ ग्रॅम वजनाचे एमडी, १२ लाख ६० हजार रुपये रोख, दोन वाहने, ६ मोबाइल असा एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण, पोलीस निरीक्षक महेश गुरव (गुन्हे) आदींच्या पथकाने या टोळीचा छडा लावला.