मुंबई: पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पित्यानेच आपल्या दोन वर्षांच्या मुलाची दीड लाख रुपयांना विक्री केल्याचा गंभीर प्रकार ॲन्टॉप हिल परिसरात घडला. याप्रकरणी आरोपी पित्यासह चौघांविरोधात मानवी तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा प्रकार मुलाच्या आजोबांच्या लक्षात आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

दरम्यान, मुलाची उत्तर प्रदेशातील एका दाम्पत्याला विक्री करण्यात आल्याची माहिती चौकशीत उघड झाली. मुलाच्या विक्रीतून आरोपीला एक लाख ६० हजार रुपये मिळाल्याचे उघड झाले. अॅन्टॉप हिल परिसरातील विजय नगर येथे अमर धीरेन सरदार यांच्या मुलीचा आरोपी अनिल पूर्वया याच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी काजल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा नातू वडील अनिल यांच्यासोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून नातू दिसला नाही, म्हणून चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.

हेही वाचा : Dream11 App: ड्रीम ११ ॲप हॅक; संवेदनशील डेटा डार्क वेबवर टाकण्याची धमकी; सायबर पोलिसांनी केली मोठी कारवाई

आजोबा अमर धीरेन यांना भेटला नाही. जून महिन्यापासून ते अनिलला नातवाबद्दल विचारत होते. पण तो काही तरी कारण सांगून वेळ मारून नेत होता. अखेर त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता जवळच राहणाऱ्या आस्मा शेख हिच्यामार्फत मुलाला विकल्याचे निष्पन्न झाले.

अनिलने जुलै महिन्यात घरात कोणालाही न सांगता मुलाला शेखकडे नेले. त्याने आशा पवार, शरीफ शेख व इतर आरोपींच्या मदतीने मुलाची विक्री केली. मुलाच्या विक्रीतून अनिलला एक लाख ६० हजार रुपये मिळाल्याचे उघड झाले. अखेर मुलाचे आजोबा अमर धीरेन यांनी तात्काळ वडाळा ट्रक टर्मिनस (टीटी) पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत: याप्रकरणी तक्रार दाखल केली.

हेही वाचा : उद्याच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयात आव्हान

पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सीमा खंडागळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून आणखी दोन आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींच्या चौकशीत मुलाची उत्तर प्रदेशातील दाम्पत्याला विक्री करण्यात आल्याचा संशय आहे.