मुंबई : पाली येथील ‘पापा पन्चो दा ढाबा’ या हॉटेलमध्ये एका व्यक्तीला जेवणामध्ये मृत उंदीर सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये एफडीएने ७० हॉटेल्सविरोधात कारवाई केली असून नियमांची पूर्तता करेपर्यंत सहा नामांकित हॉटेल्सना व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘पापा पन्चो दा ढाबा’मध्ये जेवणात मृत उंदीर सापडल्याने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याची दखल घेत एफडीएने शहरातील सर्व लहान-मोठ्या हॉटेल्सची पाहणी सुरू केली आहे. मुंबईमध्ये साधारणपणे १० हजारांहून अधिक शाकाहारी व मांसाहारी हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समधील जेवण बनविण्याची पद्धत, स्वयंपाकघर, साफसफाई, कर्मचाऱ्यांची स्वच्छता, पिण्याचे पाणी या बाबींची तपासणी एफडीए करीत आहे. या कारवाईत प्रशासनाने मागील काही दिवसांत ७० हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या हॉटेल्समध्ये स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्या आहेत. तसेच मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्सचा त्यात समावेश आहे.
हेही वाचा : मुंबई : साकिनाका येथे ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या
या सहाही हॉटेल्समध्ये अस्वच्छता, स्वयंपाकघरात झुरळ, उंदरांचा वावर, निकृष्ट दर्जाचे पिण्याचे पाणी आदी त्रुटी आढळल्या असून या हॉटेल्सना व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, हॉटेल्सवरील कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कारवाई अधिक तीव्र करणार
वांद्रे येथील ‘पापा पन्चो दा ढाबा’पाठोपाठ ‘बडेमियाँ’ आणि ‘मुंबई दरबार’ या नामांकित हॉटेल्समध्ये निकृष्ट दर्जाची व्यवस्था, स्वयंपाकघरात अस्वच्छता आढळून आली असून हॉटेल्सविरोधातील ही कारवाई आता अधिक तीव्र करण्यात येणार आहे. जेवणाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, काही हॉटेल्सना दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही हॉटेल्सना त्रुटींची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त (अन्न), शैलेश आढाव यांनी दिली.
हेही वाचा : मैत्रीला कलंक! दिल्लीतील फॅशन डिझायनरवर मुंबईत बलात्कार, पीडितेच्या व्यावसायिक मित्रानेच केला घात!
‘बडेमियाँ’वर कारवाई
एफडीए प्रशासनाने १३ सप्टेंबर रोजी कुलाबा येथील ‘बडेमियाँ’ हॉटेलच्या तिन्ही आस्थापनांवर कारवाई केली. तिन्ही आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान वैध अन्न परवाना नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर तपासणीत त्रुटी आढळल्याने कच्च्या व तयार अन्नपदार्थाचे १० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच अन्न परवाना प्राप्त करेपर्यंत व तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करेपर्यंत अन्न व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
हेही वाचा : VIDEO: अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा; अंनिसची ‘त्या’ भोंदूबाबावर कारवाईची मागणी
व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावलेली रेस्टॉरंट
- ‘बडेमियाँ’ ( कुलाबा परिसरातील तिन्ही रेस्टाॅरंट)
- ‘पापा पन्चो दा ढाबा’ (वांद्रे)
- ‘मुंबई दरबार’ – माहीम
- ‘हायपर किचन फुडटेक’ – गोवंडी