मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या बुधवारी तीनशेच्या घरात गेली. परिणामी, मागील महिनाभरात बाधितांचे प्रमाण एक टक्क्यांवरून चार टक्क्यांवर गेले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड हजारांच्या पुढे गेली आहे. शहरातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्येतही भर पडत आहे. शहरात सात दिवसांमध्ये बाधितांची संख्या दुप्पट होत २०० वरून आता ३०० पर्यंत गेली आहे. एवढी रुग्णसंख्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात आढळत होती.

बुधवारी शहरात २९५ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. बुधवारी शहरात १९४ रुग्ण करोनामुक्त झाले. दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बाधितांचे प्रमाणही मागील दहा दिवसांत दुपटीने वाढून दोन टक्क्यांवरून चार टक्क्यांवर गेले आहे. मंगळवारी शहरातील चाचण्यांचे प्रमाणही वाढून नऊ हजारांच्या वर गेले आहे. शहरात नऊ हजारांहून जास्त चाचण्या एप्रिलमध्ये केल्या होत्या. त्यानंतर हे प्रमाण सरासरी सात ते आठ हजारांदरम्यान राहिले आहे.

रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने उपचाराधीन रुग्णांच्या संख्येचा आलेखही आता दीड हजारापर्यत गेला आहे. सध्या शहरात १ हजार ५३१ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ रुग्णसंख्येतील वाढ होत असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मागील दोन दिवसांत काही अंशी वाढ झाली आहे. आतापर्यत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दहाच्या आतच होती. परंतु मंगळवारी १७ तर बुधवारी १२ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. परिणामी, रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्याही आता ६३ वर गेली आहे.

या भागांमध्ये प्रादुर्भाव अधिक

शहरात १८ ते २४ मे या आठवडाभरात सर्वाधिक म्हणजे १९० रुग्ण अंधेरी पश्चिम विभागात आढळले आहेत. या खालोखाल वांद्रे पश्चिम भागामध्ये १२३ रुग्णांचे निदान झाले आह. यासोबतच शहरात कुलाबा, ग्रॅन्ट रोड, अंधेरी पूर्व या भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.