मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत बुधवारी संध्याकाळी त्यांचा रोड शो होत असून या रोड शोसाठी ‘मेट्रो १’च्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक – घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद करण्यात आली आहे. कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून मतदानाला केवळ चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईत सर्व पक्षांकडून प्रचाराला जोर देण्यात आला आहे. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी बुधवारपासून मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत बुधवारी त्यांचा रोड शो होणार आहे, तर उद्या त्यांची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी एमएमओपीएललाही रोड शोदरम्यान मेट्रो सेवा बंद ठेवण्याची लेखी सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार एमएमओपीएलने बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून पुढील निर्णय होईपर्यंत जागृती नगर स्थानक – घाटकोपर स्थानकांदरम्यानची ‘मेट्रो १’ची सेवा बंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा : घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात; मुंबई पोलीस म्हणाले…

कार्यालयातून घरी परतण्याच्या वेळी ‘मेट्रो १’ची सेवा अनिश्चित काळापासून जागृती नगर – घाटकोपर स्थानकांदरम्यान बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. काही तांस आधी मेट्रो सेवा बंद करण्यात येत असल्याची घोषित करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी सर्वसामान्यांना वेठीस का धरण्यात येत आहे, असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यापूर्वी २०२३ मध्ये ‘मेट्रो २ अ’ (दहिसर – अंधेरी पश्चिम) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर – गुंदवली) मार्गिकांच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने ‘मेट्रो १’ची सेवा बंद करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai jagruti nagar ghatkopar metro 1 service stopped for pm narendra modi s road show mumbai print news css