मुंबई : मध्य रेल्वेच्या हद्दीत आणि हद्दीलगत अनेक पायाभूत कामे सुरू असतात. त्यामुळे रेल्वे मार्गात जेसीबीच्या मदतीने कामे करण्यात येतात. मात्र, जेसीबी चालकाकडून रेलटेलच्या केबलचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले असून केबलचे नुकसान केल्याप्रकरणी जेसीबी चालकाला दीड लाख रुपये दंड स्वरुपात रेल्वेला द्यावे लागले आहेत.

हेही वाचा : मोटरमनने वाचवले प्रवाशांचे प्राण, प्रसंगावधान दाखवून संभाव्य अपघात रोखला

मध्य रेल्वेच्या भिवंडी रोड आणि खारबावदरम्यान २७ मे रोजी जेसीबीद्वारे काम करण्यात येत होते. यावेळी रेलटेलच्या केबलचे प्रचंड नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यानंतर जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरोधात कल्याण येथील रेल्वे न्यायालयात खटला चालवण्यात आला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून त्यांच्यावर १.६० लाख रुपये दंड ठोठावला. तसेच ९ जून रोजी तुर्भे, नवी मुंबई येथे एका अवजड वाहनाने उंची मापक तोडून रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने आरोपीविरोधात खटला चालवला. त्यात दोन लाख रुपयांहून अधिक रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ११ जून रोजी कल्याण येथील रेल्वे न्यायालयाने मध्य रेल्वेच्या बाजूने निकाल दिला आणि आरोपीला २.०५ लाख रुपये दंड ठोठावला. गेल्या आठ महिन्यात मुंबई विभागातील रेल्वे कायद्यातील प्रकरणांमध्ये रेल्वेला एकूण ५१ लाख रूपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.