मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने २०२४ मध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर विक्रीस काढलेल्या शिरढोण आणि खोणीमधील एकूण ६ हजार २४८ घरांच्या किंमतीत अखेर कोकण मंडळाने कपात केली आहे. शिरढोणमधील घरांच्या किंमतीत एक लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तर खोणीतील घरे एक लाख एक हजार ८०० रुपयांनी स्वस्त झाली आहेच. हा विजेत्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
म्हाडाचे कोकण मंडळ मुंबई महानगर प्रदेशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (शहरी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या संख्येने घरे बांधत आहे. कोकण मंडळ खोणी आणि शिरढोणमध्ये पीएमएवायअंतर्गत शेकडो घरांची निर्मिती करीत आहे. शिरढोण आणि खोणीतील पीएमएवायमधील घरांसाठी मंडळाकडून अनेकदा सोडत काढण्यात आली आहे. मात्र निरनिराळ्या कारणांमुळे ही घरे विकली जात नसल्याने ती रिक्त राहिली आहेत. त्यामुळे मंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अखेर मंडळाने पीएमएवायमधील घरांचा समावेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत केला. त्यानुसार २०२४ मध्ये प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत शिरढोण आणि खोणीतील ६ हजार २४८ घरांसाठी सोडत काढण्यात आली. सोडतीनुसार शिरढोणमधील घरांची किंमत २० लाख ७२ हजार १४६ रुपये, तर खोणीतील घरांच्या किंमती २० लाख १३ हजार ५०० रुपये होती. पण आता मात्र या दोन्ही ठिकाणच्या घरांच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
शिरढोण येथील घरांच्या किंमतीत एक लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानुसार आता २० लाख ७२ हजार १४६ रुपयांऐवजी आता १९ लाख २८ हजार ७४२ रुपये अशी किंमत आता विजेत्यांकडून घेण्यात येणार आहे. तर खोणीतील घरांच्या किंमतीत एक लाख एक हजार ८०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता खोणीतील घर २० लाख १३ हजार ५०० रुपयांऐवजी १९ लाख ११ हजार ७०० रुपयांत विकले जाणार आहे. घरे स्वस्त झाल्याने प्रथम प्राधान्यमधील पात्र विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या घरांच्या किंमती नेमक्या कोणत्या कारणाने कमी करण्यात आल्या याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.