मुंबई : म्हाडाची घरे आता १० ते २५ टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत. वरळी, ताडदेवमधील घरांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे, तसेच म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला सोडतीसाठी मिळणारी घरे महाग असल्याने टीका होत आहे. तर दुसरीकडे मुंबई मंडळाच्या सप्टेंबर २०२४च्या सोडतीतील घरांना प्रतिसादही मिळत नव्हता. या बाबी लक्षात घेता अखेर म्हाडाने पुनर्विकासाद्वारे सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमतीत १० ते २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सप्टेंबर २०२४ च्या सोडतीपासून लागू करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार २०३० घरांच्या सोडतीतील वरळीमधील अत्यल्प गटातील २ कोटी ६२ लाखांच्या घरांच्या किमतीत २० टक्क्यांनी घट झाली असून आता हे घर २ कोटी १० लाखांत विकले जाणार आहे. तर ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घरांच्या किमतीत १० टक्क्यांनी घट झाल्याने आता हे घर ६ कोटी ८२ लाखांत विकले जाणार आहे. सोडतीतील इच्छुकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातील (३३ (५) अंतर्गत उपलब्ध होणारी घरे) काही घरे मुंबई मंडळाला सोडतीसाठी उपलब्ध होतात. तर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाद्वारे म्हाडाच्या हिश्शातील घरे सोडतीसाठी उपलब्ध होतात. या घरांचा सोडतीत समावेश करताना शीघ्रगणकाच्या (रेडीरेकनर) ११० टक्के दराने किमती निश्चित केल्या जातात. वरळी, दादर, ताडदेव अशा मोक्याच्या ठिकाणच्या शीघ्रगणकाचे दर भरमसाट आहेत. त्यामुळे घरांच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. यंदा सप्टेंबरमधील सोडतीतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

हे ही वाचा… विद्याविहार पुलाचे काम आणखी रखडले; झाडे, बांधकामे हटवल्याशिवाय काम सुरु होणे अवघड

वरळीतील अल्प गटातील घराची किंमत चक्क दोन कोटी ६२ लाख रुपये होती. महिना ५० हजार ते ७५ हजार रुपये उत्पन्न असलेल्या अर्जदार, इच्छुकांना ही घरे परवडणार नाहीत, त्यांना गृहकर्जही मिळणार नाही. यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.

हे ही वाचा… मुंबई पालिका शाळेतील २००० शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर, निर्णय बदलल्याने नाराजी

दोन घरे ही अत्यल्प गटातील

सप्टेंबर २०२४च्या सोडतीत पुनर्विकासाद्वारे उपलब्ध झालेल्या ३७० घरांमधील दोन घरे ही अत्यल्प गटातील आहेत. यातील एका घराची किंमत ३८ लाख ९६ हजार अशी होती. आता मात्र हे घर २९ लाख २२ हजारात विकले जाणार आहे. तर दुसरे घर अंदाजे ४२ लाख रुपये किमतीचे होते. आता हे घर २५ टक्क्यांनी स्वस्त झाल्याने हे घर ३२ लाखांत विकले जाणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या निर्णयानुसार आता पुनर्विकासाद्वारे उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमती शीघ्रगणकाच्या ११० टक्के दराने निश्चित करण्यात येतील. मात्र सोडतीत ही घरे १० ते २५ टक्के कमी किमतीत विकली जातील, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.