उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांची जागा उबदार पूर्वीय आणि आग्नेय वाऱ्यांनी घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्ण झळा बसू लागल्या होत्या. मात्र, सध्या पाकिस्तानात असलेले पश्चिमी झंझावात देशाच्या दिशेने मार्गक्रमण करत असून पूर्वीय आणि आग्नेय वाऱ्यासोबतच पश्चिमी झंझावाताचा प्रवास होणार आहे. त्यामुळे तापमानात किंचित घट होणार असून मुंबईसह नाशिक आणि उत्तर भागात काही प्रमाणात थंडी जाणवले.
हेही वाचा – मुंबई – हमालाचा खून करणारा आरोपी अटकेत
साधारण येत्या दोन दिवसांमध्ये तापमानात घट होईल आणि त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईत गारवा होता. मात्र, दुसऱ्या पंधरवड्यात थंडी आणि उष्णता, असे दोन्ही प्रकारचे वातावरण मुंबईत होते. शुक्रवारी कमाल तापमान ३४ अंश आणि किमान तापमान १९ अंश नोंदवण्यात आले. त्यामुळे दुपारच्या वेळी उष्णतेच्या झळा मुंबईकरांना सोसाव्या लागल्या. शनिवारीही सांताक्रूझ येथील किमान तापमान १९.८ अंश आणि कुलाबा येथील किमान तापमान २०.५ अंश नोंदवण्यात आले. तर, सांताक्रूझ येथील कमाल तापमान ३४.५ अंश आणि कुलाबा येथील कमाल तापमान ३०.५ नोंदवण्यात आले. त्यामुळे शनिवारीही संपूर्ण दिवसभर उबदार वातावरण होते. मात्र, रविवारी सायंकाळपासून तापमानात घट होण्याची शक्यता असून मुंबईकरांना काही प्रमाणात थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केला आहे.