मुंबई : मध्य रेल्वेचे जाळे खूप गुंतागुंतीचे असून, मध्य रेल्वेच्या लोकलमधील गर्दीमय प्रवास जीवघेणा झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू वाढले आहे. तसेच अनेक प्रवासी धावत्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या करतात. मात्र, मध्य रेल्वेच्या सतर्क मोटरमनने मे महिन्यात दोन प्रवाशांचे जीव वाचवले. तसेच मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मे महिन्यातील तीन संभाव्य रेल्वे अपघात टळले.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यान रेल्वे रूळाजवळ एक जखमी प्रवासी पडल्याचे मोटरमन जगपाल सिंग यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ लोकल थांबवली आणि इतर प्रवाशांच्या मदतीने त्या व्यक्तीला लोकलमध्ये बसवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकरीता त्याला कळवा स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले. मोटरमनच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले.

हेही वाचा : शाळेची पहिली घंटा वाजली…

दिवा रेल्वे स्थानकाजवळ धावती लोकल येत असल्याचे बघून एक महिलेने अचानक रेल्वे रूळावर उडी घेतली. हे पाहून मोटरमन एन. व्ही. पाटील यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक दाबून लोकल थांबवली. संबंधित महिला रेल्वे लोकलखाली अडकली होती. त्यानंतर स्थानकातील कर्मचाऱ्यांनी महिलेला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांनी महिलेला सुखरूप बाहेर काढले. मोटरमनच्या सतर्कपणामुळे त्या महिलेचा जीव वाचला.

हेही वाचा : मुंबई: पहिल्याच पावसात ३० ठिकाणी पाणी साचले, पालिका प्रशासनाने घेतला आढावा, विक्रोळीतील नालेसफाईच्या कंत्राटदाराला २५ हजार रुपये दंड

मुलुंड – ठाणेदरम्यान ओएचई संरचना रेल्वे रूळाच्या दिशेने वाकलेली होती. मोटरमन हेमंत किशोर यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी अनुचित प्रकार घडण्यापूर्वी तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावून लोकल थांबवली. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना सतर्क करून लाल सिग्नल दाखविला. घटनास्थळी अधिकारी आणि कर्मचारी पोहचून त्यांनी दुरूस्तीचे काम केले. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ ओएचई वायरवर झाडाच्या फांद्या अडकल्या होत्या. यावेळी मोटरमन कृष्णा कोरबल यांनी लोकल थांबवून आणि पॅन्टोग्राफ खाली केला. त्यानंतर लोकल मार्गस्थ केली. त्यामुळे ओएचईमधील संभाव्य धोका टळला.