मुंबई : मराठी रंगभूमीवरील कलाकारांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे आणि नव्या संहितालेखनाला चालना मिळावी या उद्देशाने एनसीपीएच्या (नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब’ या मराठी नाट्य उत्सवाला उत्साहात सुरूवात झाली आहे. एनसीपीएच्या लेखन कार्यशाळेतून आकाराला आलेल्या ‘अलाईव्ह’ या नाटकाने प्रतिबिंब नाट्य उत्सवाची सुरूवात झाली असून २४ मे आणि २५ मेदरम्यान या उत्सवात ‘पुरुष’ आणि ‘असेन मी नसेन मी’ या मराठीतील दोन दर्जेदार नाटकांचे प्रयोग रसिकांना पाहता येणार आहेत.

एनसीपीएच्या वतीने दरवर्षी प्रतिबिंब या मराठी नाट्य उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही या नाट्य उत्सवाचे आयोजन नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या टाटा थिएटर आणि एक्सपिरिमेंटल थिएटर येथे करण्यात आले आहे. २२ मेपासून सुरू झालेला हा नाट्य उत्सव २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या नाट्य उत्सवात नव्या-जुन्या दर्जेदार नाटकांचे प्रयोग अनुभवण्याबरोबरच कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, २४ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या कालावधीत एनसीपीएच्या जेबीटी म्युझियम येथे अनुभवी रंगकर्मी सचिन शिंदे यांच्या अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर त्याचदिवशी दुपारी ३ वाजता अमित वझे दिग्दर्शित ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे, ५ वाजता एक्सपिरिमेंटल थिएटर येथे विवेक बेळे दिग्दर्शित ‘यह जो पब्लिक है’ या वेगळ्या नाटकाचा प्रयोग होणार असून संध्याकाळी ७ वाजता टाटा थिएटर येथे राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘पुरुष’ या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकात अभिनेते शरद पोंक्षे, अविनाश नारकर आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

रविवारी, २५ मे रोजी एनसीपीएच्या जेबीटी म्युझियम येथे सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान प्रसिध्द अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कथाकथनाचं प्रशिक्षण ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता एक्सपिरिमेंटल थिएटर येथे ‘तुझी औकात काये?’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तर संध्याकाळी ४.३० वाजता प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सवाचा समारोप संदेश कुलकर्णी लिखित आणि अमृता सुभाष दिग्दर्शित ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाने होणार आहे. या नाटकात स्वत: अभिनेत्री अमृता सुभाष, नीना कुलकर्णी आणि शुभांगी गोखले यांच्या भूमिका आहेत.

एनसीपीए, पृथ्वी थिएटर या वास्तू अशा आहेत जिथे आपल्या नाटकांचा प्रयोग सादर होणे ही नेहमीच आनंददायी बाब असते. टाटांसारख्या द्रष्ट्या व्यक्तीने उभारलेल्या या वास्तूला नाटकाची, कलेची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे या वास्तूत ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे आणि तेही प्रतिबिंबसारख्या नाट्य उत्सवाचा समारोप आमच्या नाटकाने होणार आहे याचा खूप आनंद वाटतो, अशी भावना या नाटकाची दिग्दर्शिका, अभिनेत्री अमृता सुभाष यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोविडमध्ये ओटीटी माध्यम प्रेक्षकांच्या हातात आले तरी लाईव्ह सादरीकरण पाहणे, कलाकारांना प्रत्यक्ष समोर कला सादर करताना पाहण्याचा अनुभव त्यांना घेता आला नाही. त्यामुळे कोविडनंतर चित्रपटांपेक्षाही नाट्य प्रयोगांना अधिक गर्दी होऊ लागली, असे मत लेखक – दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. एनसीपीएमध्ये मधल्या काळात मराठी नाटकांचे प्रयोग फारसे झाले नाहीत, मात्र पु. ल. देशपांडे अध्यक्ष असताना इथे मराठी नाटकांचे खूप प्रयोग होत असत. आता ‘प्रतिबिंब’ सारख्या मराठी नाट्य उत्सवाच्या माध्यमातून एनसीपीएने पुन्हा एकदा मराठी नाटक आणि प्रेक्षकांना जोडून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असे सांगत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.