मुंबई : वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील सध्याची पथकर वसुली यंत्रणा जुनी झाली आहे. अनेकदा पथकर वसूल करण्यास वेळ लागत असल्याने वाहनांच्या रांगा वाढत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सागरी सेतूवरील पथकर वसुली यंत्रणा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जूनअखेरपर्यंत सागरी सेतूवर अत्याधुनिक स्वयंचलित पथकर वसुली यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे सागरी सेतूवरील पथकर वसुली वेगाने होईल आणि कर भरण्यासाठी लागणाऱ्या वाहनांच्या लांबलचक रांगाचा प्रश्न सुटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सागरी सेतूवर स्वयंचलित पथकर वसुली यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र आता ही यंत्रणा जुनी झाली आहे. देखभाल, दुरुस्तीची कामेही वाढली आहे. अनेक वेळा पथकर वसूल करण्यास वेळ लागत असल्याच्या तक्रारी येत आहे. पथकराची वसुली वेगाने होत नसल्याने वाहनांच्या रांगा वाढत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे आता सागरी सेतूवरील पथकर वसुली यंत्रणा बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली. तेथे अत्याधुनिक अशी स्वयंचलित पथकर वसुली यंत्रणा बसविण्यात येणार असून यासाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : पुन्हा लोकलघोळ! मध्य रेल्वेचा विलंबताल; वेगमर्यादेमुळे प्रवासी वेठीस
अत्याधुनिक स्वयंचलित पथकर वसुली यंत्रणेतील तज्ज्ञ कंपनीच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. यासाठी निविदा काढण्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. तर यासंबंधीची सर्व कार्यवाही पूर्ण करून जूनअखेरपर्यंत वांद्रे – वरळी सागरी सेतूवर नवीन पथकर वसुली यंत्रणा बसविण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.