मुंबई : कर्नाटकमधील गुलबर्गा येथे राहाणाऱ्या सत्तरीच्या रेणुका आजी एका लग्नासाठी वडाळा येथे नातेवाईकांकडे आल्या होत्या. दुपारच्या सुमारास अचानक तोंडाची उजवी बाजू वाकडी होऊ लागली. डावा हात व पाय बधीर होऊ लागला. बोलणे कठीण होत गेले. आजीची ही परिस्थिती पाहून नातावाईकांनी तात्काळ महापालिकेचे शीव रुग्णालय गाठले. तेथे मेडिसीन विभागातील तपासणीमध्ये अर्धांगवायू झाल्याचे निदान झाले. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत गुठळ्या झाल्या होत्या. अशा रुग्णांना पहिल्या सहा तासात उपचार मिळाल्यास ते पूर्णता बरे होऊ शकतात. शीवमधील इंट्राव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागात अत्याधुनिक उपचार यंत्रणा होती. डॉक्टरांनी तात्काळ उपचार करून मेंदुतील रक्ताची गुठळी काढण्याची शस्त्रक्रिया केली. आज्जीबाईची प्रकृती आज उत्तम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तरीच्या रेणुका आजींना शीव रुग्णालयातील मेडिसीन विभागात आणल्यानंतर विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णिक यांनी तात्काळ सिटी स्कॅनसह सर्व आवश्यक चाचण्या केल्या. यातून अर्धांगवायुचे निदान झाले. आजीबाईच्या मेंदुला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाल्याने मेंदूला रक्तपुरवठा कमी होत होता. तो बंद होण्याच्या मार्गावर होता. अशा रुग्णांना पहिल्या सहा तासांत उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णता बरा होऊ शकतो. यासाठी ‘मॅकॅनिकल थ्रोंबेक्टॉमी’ प्रक्रिया करण्याची गरज होती. यात मांडीमधून एका सुईच्या छिद्राएवढा छेद घेऊन मेंदुमधील रक्तवाहिनीतील गुठळी काढण्यात येते. शीव रुग्णालयातील इंट्राव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागात २०१६ पासून हा इलाज केला जातो. वर्षाकाठी दोन हजारांहून अधिक अशा प्रकारच्या रक्तवाहिनीमधील गुठळ्यांवरील शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील उपचाराव्यतिरिक्त विभागात डायबिटीक फुटसाठी पायाच्या गँगरीनमध्ये केली जाणारी पायाची अँजिओप्लास्टी, यकृताचे आजार, रक्तस्त्रावावरील उपचार अशा रक्तवाहिन्यांशी संबंधित अनेक आजारांवर उपचार केले जातात.

हेही वाचा… मुंबई : गणोशोत्सवातील ध्वनीप्रदूषणामुळे श्रवणयंत्रणेवर परिणाम, पुणेस्थित वकिलाची उच्च न्यायालयात धाव

हेही वाचा… सायबर फसवणुकीतील २४.५ करोड रुपये पुन्हा नागरिकांच्या बँक खात्यात जमा – विवेक फणसाळकर

रेणुका आजींवर त्या दिवशी उपचार करण्यात मेडिसीन विभाग, हृदयविकार विभाग, भूल विभाग, तसेच इंट्राव्हेन्श्नल रेडिओलॉजी विभागाने कमालीच्या वेगाने व पूर्ण समन्वय साधून उपचार केल्यामुळेच आज त्यांची प्रकृती शंभर टक्के उत्तम झाल्याचे इंट्राव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विवेक उकिर्डे यांनी सांगितले. आजी परत चालत आपल्या घरी गेल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी सांगितले. आजींवरील उपचारात सहयोगी प्राध्यपाक डॉ. कुणाल अरोरा, डॉ. अक्षय मोरे, डॉ. कुशल बिडचंदानी, तसेच मेडिसीन विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णिक यांची मोलाची भूमिका असल्याचेही डॉ. मोहन जोशी म्हणाले. खाजगी रुग्णालयात याच शस्त्रक्रियेसाठी सुमारे ११ लाख रुपये खर्च येतो मात्र सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे शीव रुग्णालयात आजींना एक रुपयाही खर्च करावा लागला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai sion hospital seventy year old grandmother underwent rare surgery mumbai print news asj
First published on: 20-02-2024 at 09:39 IST