मुंबई : कुर्ला नेहरूनगर भागातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांची व आजूबाजूच्या परिसराची दुरुस्ती मुंबई महानगरपालिकेला करावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी या परिसराची पाहणी केली असता आढळून आलेल्या दुर्दशेमुळे ते संतप्त झाले होते. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार, १ ऑक्टोबर रोजी कुर्ला येथील नेहरूनगर भागात वत्सलाताई नाईक नगर या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत (एसआरए) येत असलेल्या परिसराला अचानक भेट देऊन तेथील सार्वजनिक स्वच्छता कामांची पाहणी केली. यावेळी येथील परिसर व शौचालयाची दूरवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. या दौऱ्याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल उपस्थित होते. हेही वाचा : नांदेड, छ्त्रपती संभाजीनगर न्यायालयाकडून स्वतःहून दखल; नेमके काय घडले याची माहिती सादर करण्याचे सरकारला आदेश प्रचलित धोरणानुसार एसआरए प्रकल्पातील सार्वजनिक स्वच्छता व देखभालीची जबाबदारी प्राधिकरणाची असते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आपल्या हद्दीतील प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित विकासकामार्फत सार्वजनिक स्वच्छता आणि प्रसाधनगृहांची निगा राखणे अपेक्षित असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यामुळे ही जबाबदारी आता महानगरपालिकेवर आली आहे. हेही वाचा : नांदेड रुग्णालयातील अधिष्ठात्यांसोबतच्या गैरवर्तणुकीविरोधात वैद्यकीय क्षेत्रात संताप याबाबत निर्णय घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी दुपारी एसआरए प्राधिकरणातील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यावेळी आयुक्तांनी अध्यक्ष स्थानावरून काही निर्देश दिले. शौचालयांची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी संस्था नेमण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिका प्रशासन हाती घेणार आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण मुंबईतील एसआरएअंतर्गत प्रकल्पांतील प्रसाधनगृहांची यादी एसआरएने महानगरपालिकेला सोपवावी, त्या ठिकाणच्या प्रसाधनगृहांची स्थिती जाणून घेतल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याबाबत मुंबई महानगरपालिका आणि एसआरए संयुक्तपणे दिशा ठरवतील, असे निर्देश चहल यांनी बैठकीत दिले. या बैठकीला महानगरपालिका अधिकाऱ्यांबरोबरच आमदार मंगेश कुडाळकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता म्हसाळ, सहायक अभियंता तनपुरे आणि वत्सलाताई नाईक नगर प्रकल्प विकासाच्या वतीने संबंधित वास्तूविशारद उपस्थित होते. हेही वाचा : अधोविश्व: दाऊद टोळीचा रुग्णालयात गोळीबार वत्सलाताई नाईक नगर परिसर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासन स्वतःहून तातडीने पावले उचलणार आहे. वत्सलाताई नाईक नगरातील संबंधित शौचालयांची दुरुस्ती आणि स्वच्छता महानगरपालिका हाती घेणार आहे. त्याचप्रमाणे शौचालय परिसरात स्टॅम्पिंग करून दुरुस्ती केली जाईल. शौचालयांची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात येईल. ही कार्यवाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या हद्दीत असल्याने त्याची देयके प्राधिकरणाकडे पाठविण्यात येतील, असे निर्देश चहल यांनी यावेळी दिले.