मुंबई : कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणेशोत्सवानिमित्त कुटुंबियांसह जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून उत्सवासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्यांनी एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १,३०१ बसचे गट आरक्षणासह एकूण २,०३१ जादा बस आतापर्यंत पूर्ण आरक्षित झाल्या आहेत. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ ते ७ सप्टेंबर दरम्यान ४,३०० जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून कोकणातील थेट गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच सुखरूप पोहोचवते. दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सुमारे ४,३०० जादा बस सोडण्यात येणार असून त्यापैकी २,०३१ बसचे पूर्ण आरक्षण झाले आहे. हेही वाचा : मोफा कायद्याचे भवितव्य पुन्हा महाधिवक्त्यांवर अवलंबून! सुधारणा करण्याचा प्रयत्न तूर्त अयशस्वी गणेशोत्सव काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानके व बसथांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.